Friday, 5 June 2020

अजुन रेंगाळती ..........



अजुन रेंगाळती  इथल्या वास्तूत
आठवणींचे अवीट सुगंध
वटवृक्षाच्या पारंब्या सम
गूढ जाणते भावूक बंध

अजुन रेंगाळती  इथल्या वास्तूत
गप्पा अन् हास्य धुमारे
सायंकाळी दिवा मंदिरी
उजळत होते शांत गाभारे

अजुन रेंगाळती  इथल्या वास्तूत
हळद हळवे पिवळे पाऊल
शालीन घडीची जरी पैठणी
देतसे नव्या नवतीची चाहूल

अजुन रेंगाळती  इथल्या वास्तूत
आबांचा आवाज करारी
दौत लेखणी मेज नेटके
अन् झिजल्या वहाणा दारी

अजुन रेंगाळती  इथल्या वास्तूत
भले बुरे ते उत्कट क्षण
हात फिरवता सोपानावरी
भावूक होई हे ओले मन

No comments:

Post a Comment