Friday, 5 June 2020

श्वास


खूप दिवसांनी जाणवलेला
माझाच श्वास
आज काहीतरी वेगळाच
अर्थ सांगून गेला
जणू माझ्या जगण्याचा
नवा मंत्र घेऊन आला

आईच्या गर्भात असताना
तिच्या श्वास उच्छवासाच्या
हिंदोळ्यावर मीही झोके घेतले होते
अधीर झालेली तिची स्पंदने
मला जाणवली होती
एका क्षणी तिने दीर्घ श्वास घेत
माझ्या प्रवेशाचे द्वार खुले केले
अन् टाहो फोडीत मी
श्वास घेऊ लागले, काय
वेगळा अनुभव असेल नाही
त्याचं वेगळेपण जपायच्या आधीच
तो इतका सवयीचा झाला
की मला तो कधी जाणवलाच नाही
वर्षामागुन वर्ष सरत होती
मीही श्वास घेतच होते
नाही म्हणायला यौवनात
अधीर झालेले काही श्वास
मनात घर करून राहिले होते

आज मात्र घेता न येणारा श्वास
जाणवलं होता, अवचित तो त्याच्या
अस्तित्वाचं महत्व
रेखित करत होता
मी मात्र पहात होते निर्विकार पणे
माझ्यात असून नसलेल्या श्र्वासाकडे
मनात जगण्याची इच्छा होती
आज पहिल्यांदा नतमस्तक झाले
मी माझ्या श्वासा समोर
अन् पहिल्यांदा मला माझा श्वास वेगळाच
भासला
पुन्हा एकदा जगण्याचा
अर्थ सांगून गेला

No comments:

Post a Comment