काळोखाची ओढून रजई
माळरानं हे झोपी जाई
कुशीत त्याच्या कोमल कालिका
रातकिडे गाती अंगाई
प्रहर लोटता अंधाराचा
पूर्व दिशेला सडा केशरी
हासत उठली हिरवी पाती
दवबिंदू चा मुकुट रुपेरी
साखरझोपी अजून कळी ही
हळूच बावरी जागी होई
नयनी तिच्या स्वप्नाची धुंदी
अन् फुलण्याची अल्लड घाई
सोनसळी तो प्रकाश सरा
आसमंत हा भारून जाई
अंधाराला मागे सारून
जणू आशेची पहाट होई
No comments:
Post a Comment