किडुक मिडुक घेऊन हाती
मजल दरमजल करतं आहे
सांगावेसे वाटते तुला,
मला सुद्धा चेहरा आहे
आलो होतो इथे,
मनी ठेवून एकच ध्यास
काम करीन मन लावून
नाही करणार कसला हव्यास
रोजंदारी, रोजची मजुरी
सारेच झाले आहे ठप्प
मतांचीभीक मागणारे नेते
आता मात्र आहेत गप्प
खायला कोंडा अन्
निजायला धोंडा
गोष्टीत वाचायला छान वाटतो
व्याकुळ माझी बायका मुलं
जीव मात्र माझाच जळतो
न्हावी, भैय्या, भंगी, चांभार
कुठेही मी दिसेन तुला
ज्याचं अस्तित्वच आहे शून्य
त्याला चेहरा हवा कशाला
धर्म नाही, जात नाही
ते सारे तुमच्यासाठी
अंधारतल्या प्रकाश वाटा
शोधत राहतो मी स्वतःसाठी
मनात तुमच्याही भीती
अन् उद्याचा प्रश्न आहे
इथे उद्याचा प्रश्नच नाही
जिथे आजची भ्रांत आहे
आशेचे हे घेऊनी शस्त्र
असहाय लढतो आहे
दर दिवशी नवीन बळ
नवीन उत्तर शोधतो आहे
सारे काही होता सुरळीत
गरज माझीही भासणार आहे
सांगावेसे वाटते तुला
मला सुद्धा चेहरा आहे
khup sunder!!
ReplyDelete